
पालकमंत्री उदय सामंत यांचा करिष्मा, रत्नागिरीत शिंदे शिवसेनेचा दणदणीत विजय; सर्व उमेदवार विजयी, जल्लोष
पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा करिष्मा दाखवला असून रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करून इतिहास घडवला.
मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच निकाल स्पष्ट झाले आणि शिवसेनेच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्र परिसरात एकच जल्लोष उसळला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि कार्यकर्त्यांच्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला.
विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या विजयामुळे तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती. रत्नागिरीत शिवसेनेचा हा विजयी गुलाल उधळत असतानाच, तालुक्याच्या राजकारणात नव्या उत्साहाची आणि आत्मविश्वासाची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.




