ओळख महाभारताची. भाग १७. धनंजय चितळे



भारत-सावित्री

महाभारत ग्रंथ नक्की काय शिकवतो, याचे उत्तर महर्षी व्यास यांनी महाभारताच्या अखेरीस देऊन ठेवले आहे. त्यांनी लिहिलेले हे चार श्लोक भारत-सावित्री या नावाने ओळखले जातात. हे श्लोक म्हणजे जणू महाभारताचे सार आहे.

या श्लोकांमध्ये महर्षी व्यास सांगतात, ”मनुष्य या जगामध्ये हजारो माता-पिता, तसेच शेकडो स्त्री-पुरुषांचा संयोग-वियोग अनुभवीत आहे .पूर्वीही अनुभवला आणि पुढेही अनुभवणार आहे. अज्ञानी माणूस आपल्या आयुष्यात आनंदाचे हजारो आणि भयाचे शेकडो प्रसंग अनुभवीत असतो. हे प्रसंग ज्ञानी माणसाच्या आयुष्यातही येतात. पण त्या प्रसंगांचा ज्ञानी व्यक्तीच्या चित्तावर कोणताही परिणाम होत नाही, असे मी दोन्ही हात वर करून जोरजोराने अगदी कंठशोष करून सांगत आहे, पण माझे वचन कोणीच ऐकत नाही.”

वेदव्यास पुढे म्हणतात, ”धर्मामुळे मोक्ष तर सिद्ध होतोच, शिवाय अर्थ आणि काम हेही सिद्ध होतात. तरी पण लोक धर्माचे का सेवन करीत नाहीत? कामना, भय, लोभ अथवा प्राण वाचवण्यासाठीसुद्धा धर्माचा त्याग करू नये. धर्म नित्य आहे व सुखदुःख अनित्य आहेत. तसेच जीवात्मा नित्य आहे आणि त्याच्या बंधनाचा हेतू हासुद्धा अनित्य आहे.”

या श्लोकांचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येते की आपल्या वाट्याला आलेल्या धर्माचे पालन करणे म्हणजेच स्वधर्माचरण करणे हेच महाभारताचे मुख्य सूत्र आहे. या महाभारताची आजच्या काळात गरज काय आहे ते सांगताना लोकमान्य टिळक म्हणतात, ”महाभारत ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात धर्मराजाची सत्यनिष्ठा, कर्णाची उदारता, भीमाचे बाहुबळ, अर्जुनाचे युद्धकौशल्य इत्यादी अनेक अवर्णनीय गुणांची वर्णने आली आहेत. ही सर्व वर्णने वाचनीय व मननीय आहेत. पितामह भीष्मांचा दृढनिश्चय आणि श्रीकृष्णाचे राजनीतिपटुत्व यांचे तर महत्त्व विलक्षण आहे. माझे भारतीय युवकांना सांगणे आहे की त्यांनी महाभारताचे अवश्य वाचन करावे आणि पितामह भीष्मांचा दृढनिश्चय आणि श्रीकृष्णाचे राजनीतिपटुत्व अंगी बाणवावे.”

महात्मा गांधीजी म्हणतात, ”महाभारत ही अमूल्य रत्नांची खाण आहे. तिला तुम्ही जितके खणाल तितकी अधिक मौल्यवान रत्नेच तुमच्या हाती येतील. महाभारत हा केवळ ऐतिहासिक ग्रंथ नाही, तर त्यात सत्य-असत्य आत्मा, जड, ईश्वर, सैतान यांच्यातील सनातन द्वंद्वाचे वर्णन आहे. भारतीय प्राचीन ग्रंथात जे सत्यसिद्धांत सापडतात, ते सर्व महाभारतात एकत्रित आहेत. म्हणून महाभारत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.”

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा महाभारत आणि रामायण या ग्रंथांच्या अभ्यासाचे महत्त्व जाणून होते. त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकात या ग्रंथांबद्दल खूप चांगले उद्गार काढले आहेत. त्यात ते म्हणतात, ”भारताला अभिमानास्पद व परम मूल्यवान वाटणाऱ्या रामायण व महाभारत या दोन अप्रतिम महाकाव्यांचे ज्ञान संपादन केल्याविना भारत देश अगर त्यातील रहिवासी यांचा सम्यक् बोध होणार नाही.”

थोडक्यात सांगायचे तर केवळ संत-महात्म्यांनी नाही तर राष्ट्रीय नेत्यांनीसुद्धा महाभारत हा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा, असे आग्रहाने सांगितले आहे. म्हणूनच धर्म आणि धर्मनिरूपण असलेला हा ग्रंथ आपल्या नित्य वाचनात यावा, हीच योगेश्वर श्रीकृष्णचरणी प्रार्थना.

भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज की जय.
(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button