
मांदिवली पुलावरून होतेय क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक
मायनिंग कंपनीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक
दापोली : स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून अखेर मायनिंग कंपनीने मांदिवली परिसरात आपले पाय घट्ट रोवले असून, यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहेत. ही कंपनी होऊ नये म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला; मात्र ग्रामस्थांच्या विरोधाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे येथील नागरिक खूप मोठ्या समस्येला सामोरे जाताना दिसत आहेत.
मांदिवली पुलामुळे सुमारे १० गावांचे दळणवळण सुरू आहे. हा पूल १९७१ साली बांधण्यात आला असून, आज ५६ वर्ष पूर्ण झाली आहेत. हा पूल म्हणजे अनेक गावांना जोडणारा दुवा आहे. या पुलावरून वाहतुकीला १८ टनाची परवानगी असताना मायनिंग कंपनी डंपरद्वारे ३५ ते ४० टनाची वाहतूक करत आहे. त्यामुळे हा पूल कमकुवत झाला आहे. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या कंपनीची एवढी मुजोरी वाढली आहे की बिना नंबरप्लेटने डंपर मायनिंगची वाहतूक करत आहेत. त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. या भागातील संपूर्ण परिसर मायनिंगमुळे उद्ध्वस्त होत असून याकडे शासन डोळेझाक करताना दिसत आहे.
याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ भावेश कारेकर यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन या मायनिंग कंपनी विरोधात अनेकवेळा उपोषणे आंदोलने केली आहेत. मात्र याचा कोणताही परिणाम मायनिंग कंपनीवर झालेला नाही. सनदशीर मार्गाने ही कंपनी आम्ही बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला असून आता या कंपनीविरोधात ग्रामस्थ एकवटले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच शासनाने याकडे लक्ष देऊन मायनिंग कंपनीची सुरू असलेली मुजोरी थांबवावी अशी मागणी होत आहे.




