
IIT पवई वसतिगृहात जिवंत काडतुसे प्रकरणी तपास; संबंधितांना अटक – राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई.
दि. १२ मार्च, २०२६
मुंबईतील आयआयटी पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून संबंधित व्यक्तींना अटक केली असून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती गृह विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली.
नियम ९३ अन्वये सदस्य श्री. भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, आयआयटी मुंबई ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तेथे तपासासाठी पोलिसांना पूर्वपरवानगीने जावे लागते. संबंधित प्रकरणात एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेमध्ये जिवंत काडतुसे आढळून आली होती.
सदर विद्यार्थी व त्याचा मित्र हे दोघेही बिहार येथील असून, आयआयटी पवईच्या वसतिगृहात पाहुण्यांना राहण्याची परवानगी असल्यामुळे तो मित्र तेथे आला होता. त्याच्या बॅगेमध्ये आढळलेली काडतुसे बिहारमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी काडतुसे पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच ज्याच्याकडून ती विकत घेतली होती त्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण साखळी शोधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागील उद्देश काय होता याबाबत अधिक तपास सुरू असून चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती सभागृहाला अवगत करून दिली जाईल, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
000 00



