
राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल – राज ठाकरे
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मनसे आता मुंबई महापालिकेतही उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल असे राज यांनी म्हटले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राज यांनी बाळासाहेबांच्या भूमिकांबाबत भाष्य करताना त्यांनी कधीही मराठीच्या मुद्यावर तडजोड केली नसल्याकडे लक्ष वेधले आहे. राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
राज यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढवल्या. सत्ता काबीज करण्यास ठाकरे बंधूंना अपयश आले. तर, मनसेचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आता राज ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीनंतर मुंबईतही पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.




