
लोकांची मने पैशांनी नाही विचारानेच जिंकली जातात : आमदार भास्कर जाधव
दापोली : “विकासाची भाषा करणारे आज सर्वत्र दिसतात, पण ज्या मतदारसंघात स्वतःचे नेतृत्व मंत्रीपदी आहे, त्या भागातील रस्ते आणि सुविधांची अवस्था आजही बिकट आहे. पैशाने निवडणुका जिंकल्या जातात; पण लोकांची मने मात्र विचारानेच जिंकली जातात,” अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर तीव्र निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली येथे आयोजित गण-गटनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. याच निमित्ताने दापोलीत आयोजित या बैठकीत निवडणूक तयारी, उमेदवारांची निवड, जनसंपर्क मोहीम आणि आघाडीतील समन्वयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, माजी नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जाधव म्हणाले, “अनेकांनी विकासाच्या नावाखाली घोषणाबाजी केली. आज मतदारांना खऱ्या विकासाची ओळख पटली आहे. पैसा वापरून मतं विकत घेणे सोपं आहे; पण काम, वागणूक आणि विचार यावर लोकांचा विश्वास टिकतो. आम्ही विकास हा केवळ मंचावर बोलण्यापुरता न ठेवता तो प्रत्यक्षात करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो.”
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “ज्या तालुक्यावर मंत्रीपदाचा आशीर्वाद आहे, तिथेच रस्त्यांची अवस्था विचार करण्यासारखी आहे. हे वास्तव जनतेच्या लक्षात आलेले आहे.” .
आगामी निवडणूक आघाडीबाबत बोलताना आमदार जाधव यांनी आघाडी निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करताना सत्ताधारी युतीमध्ये ताळमेळच नाही. त्यामुळे या तफावतीचा फायदा आघाडीला होणार असल्याचे म्हणाले.
दापोली तालुक्यातील राजकीय समीकरणे आगामी दिवसांत आणखी रंगतील, असा संकेत या बैठकीने दिला आहे.




