
ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत घुमजाव, नुकसान भरपाई न मिळाल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा
मुसळधार पावसामुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीनंतर ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत दिलेल्या आश्वासनानंतर घुमजाव सुरु झाल्याने लांजा शहरवासियांनी आक्रमक भूमिका घेतली. कंपनीच्या प्रतिनिधीला तहसीलदार कार्यालयात धारेवर धरले. तसेच येत्या दोन दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास गुरूवारी महामार्गाचे काम बंद पाडणार असा इशारा देण्यात आला.
शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे शहरातील महामार्गावर असलेल्या श्रीराम पुलाजवळील वहाळ येथे शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तुंबले होते. यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. विशेषतः गेल्या सहा महिन्यातील याच परिसरातील ही चौथी घटना होती. तरी देखील ठेकेदार कंपनीने यासंदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखवल्याने स्थानिक नागरिकांमधून रोष व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यावेळेस नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीकडून देण्यात आले होते.www.konkantoday.com




