किनार्‍यावरील ’धूप’ प्रतिबंधक बंधार्‍यामुळे अंडी घालण्यासाठी आलेली कासवे परतली


एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने सागरी कासवांच्या संवर्धनासाठी राज्यपातळीवर समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे मात्र राज्यात त्यात सागरी कासवांच्या नैसर्गिक अधिवासाचा -हास करणारी कामे सुरू असल्याचे चित्र आहे. कोकणातील सागरी कासवांच्या विणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या किनार्‍यांवर धूप प्रतिबंधक बंधारे उभारण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक मादी कासवे अंडी न घालताच समुद्रात परतत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात किनार्‍याची धूप रोखण्यासाठी पतन विभागामार्फत विविध किनार्‍यांवर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात येत आहेत, पतन विभागाने दिलेल्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील २५ किनार्‍यांच्या संरक्षणासाठी या कामांना मान्यता देत निधीही मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली, तरी यामुळे सागरी कासवांच्या विणीसाठी महत्वाच्या असलेल्या किनार्‍यांना मोठा फटका बसत आहे.
नेवरे आणि दापोली तालुक्यातील आडे या किनार्‍यांवर सध्या बंधार्‍यांचे काम सुरू असून, येथे सागरी कासवांच्या विणीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या निरीक्षणानुसार, या ठिकाणी अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवे अडी न घालताच परतत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २८ किनार्‍यांवर सागरी कासवांची वीण होत असून, त्यापैकी २५ किनार्‍यांवर बंधारे प्रस्तावित आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button