
पहिल्या ३ दिवसांतच लालबागच्या राजाच्या दानपेटीत कोट्यवधींचा पाऊस;
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत भक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान केले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मंडळाला १ कोटी ९० लाख रुपये रोख, ६४७.४७ ग्रॅम सोने आणि सुमारे १२,३८९ ग्रॅम चांदी दानातून मिळालीया सर्व दानाची एकूण किंमत सुमारे ३ कोटी १८ लाख रुपये असल्याचे मंडळाच्या व्यवस्थापन समितीने सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पहिल्या तीन दिवसांत १ कोटीहून अधिक रोख रुपये
मंडळाच्या दानपेट्या दररोज पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर उघडल्या जातात. पहिल्या तीन दिवसांत दानपेट्यांमधून १ कोटी ९० लाख रुपये रोख मिळाले. याशिवाय ६४७.४७ ग्रॅम सोने, ज्याची किंमत सुमारे ९९ लाख रुपये आहे, तसेच १२,३८९ ग्रॅम म्हणजेच १२ किलोहून अधिक चांदी, ज्याची किंमत सुमारे साडेतीस लाख रुपये आहे, भक्तांनी अर्पण केली.
सोने, चांदी अन् क्रिकेट बॅट
लालबागच्या राजाला भक्तांनी रोख रकमेसोबत विविध सोन्या-चांदीच्या वस्तूही अर्पण केल्या आहेत. यामध्ये सोन्याच्या बांगड्या, चेन, चांदीची पेन आणि चांदीवर नक्षीकाम केलेल्या क्रिकेट बॅट्स यांचा समावेश आहे.दानातून मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाणार असून, संस्थेकडून वर्षभर राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी या पैशांचा वापर केला जाणार असल्याचे ट्रस्टच्या सदस्याने सांगितले.



