रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी : तिरुपती सावर्डे, वायसीसी पावस, रोहन इलेव्हन, एसएससीसी डोंबिवली संघ उपांत्य फेरीत
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ओम साई स्पोर्टस् आयोजित व ना. उदय सामंत पुरस्कृत डे – नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 लीग स्पर्धेच्या पाचव्या दिवशी उपउपांत्य फेरीतील सामन्यातून चारसंघ उपांत्य फेरीत पोहोचले. तिरुपती बालाजी सावर्डे, वायसीसी पावस, रोहन इलेव्हन व एसएससीसी डोंबिवली संघाने विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.
उपउपांत्य फेरीतील पहिला सामना मुन्ना देसाई इलेव्हन विरुद्ध एसएससीसी डोंबिवली या संघांमध्ये झाला. यात एसएससीसी डोंबिवली संघाने मुन्ना देसाई संघाला 3 धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीत मजल मारली. एसएससीसी डोंबिवली संघाकडून विकी मुंबईकर याने 7 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या सहाय्याने 23 धावा केल्या. त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
उपउपांत्य फेरीतील दुसरा सामना तिरुपती बालाजी सावर्डे विरुद्ध शिवांग स्पोर्ट्स राजापूर यांच्यात झाला. या सामन्यामध्ये तिरुपती बालाजी सावर्डे संघाने 5 फलंदाज राखून हा सामना जिंकला. गोलंदाज सोम सिंग याला सामनावीर चषक देऊन गौरविण्यात आले. तिसरा सामना रोहन इलेव्हन विरुद्ध स्मार्ट नेट रायगड यांच्यात झाला. या सामन्यात रोहन इलेव्हन संघाने 4 फलंदाज राखून विजय संपादन केला. या सामन्यातील सामनावीर निखिल नाईक याला चषक देऊन गौरवण्यात आले.
चौथा सामना वायसीसी पावस विरुद्ध एन. बी. अवाढ पुणे यांच्यात झाला. वायसीसी पावस यांना जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 79 धावांची गरज होती. प्रशांत घरत याने अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी करत 12 चेंडूत 3 षटकार व 3 चौकाराच्या मदतीने 32 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. प्रशांत घरत याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याला कृष्णा सातपुते यांनी 10 चेंडू 3 चौकार व 1 षटकाराच्या सहाय्याने 22 धावांची मदत केली.