
टीडब्लूजे गुंतवणूक प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशयस्वतंत्र चौकशीची मागणी
__ टीडब्लूजे (TWJ) गुंतवणूक प्रकरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीडब्लूजे मध्ये तब्बल १६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवण्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. रत्नागिरीकरांची मोठी गुंतवणूक या योजनेत अडकली असून, यापूर्वीही जादा परताव्याच्या आमिषाने अनेक कंपन्यांनी जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र यावेळी फसवणुकीत अडकलेल्या किंवा गुंतवणूक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याची चर्चा असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
काही नागरिकांचा आरोप आहे की, काही पोलीस कर्मचाऱ्यांनीच लोकांना टीडब्लूजेमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले, तर काहींच्या मते स्वतः पोलिसांनी गुंतवणूक केल्यामुळे सामान्य नागरिकांचा विश्वास वाढला आणि त्यांनीही पैसे गुंतवले.
सूत्रांच्या माहितीनुसार, समीर नार्वेकर याच्या जवळच्या वर्तुळात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.
टीडब्लूजे प्रकरणी आतापर्यंत ३३ तक्रारदारांनी सुमारे ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या तक्रारींमध्ये एकाही पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश नाही, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर गुंतवणूक केली असेल, तर त्यात गैर काय?” तसेच पोलिसांचा सहभाग असल्याचे आरोप असतील, तर त्याचे ठोस पुरावे सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर ‘ स्थानिक पातळीवर तपास झाल्यास, संबंधित पोलीस एकमेकांना किंवा आरोपींना सावध करत असल्याचा आरोपही काही जण करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (EOW) करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “जर कोणत्याही पोलिसाने आपल्याला टीडब्लूजे मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले असेल, किंवा त्या पोलिसामार्फत गुंतवणूक करण्यात आली असेल, तर संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा किंवा लेखी तक्रार द्यावी. अशा तक्रारी आल्यास निष्पक्ष चौकशी केली जाईल.”
टीडब्लूजे गुंतवणूक प्रकरण हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित न राहता, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा बनत चालले आहे.




