शासनाची ३०० कोटी वृक्षारोपण मोहीमजिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठित​राज्यातील हरित आच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज


​रत्नागिरी, १५ जून . ): राष्ट्रीय वन धोरण १९८८ नुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित किंवा वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन अनुक्रमे १६.५३% आणि ४.७२% असे एकूण २१.२५% एवढेच आहे. राष्ट्रीय स्तरावरील ३३ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यात आणखी ११.७५% हरित आच्छादन वाढवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील हवामान बदलाच्या विपरीत परिणामांना आळा घालण्यासाठी, जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ३०० कोटी वृक्षारोपण मोहीम व इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
​मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार, वनक्षेत्राबाहेरील उपलब्ध जमिनींवर स्थानिक प्रजातींच्या वृक्षलागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी डिजिटल व उपग्रह-आधारित नियंत्रण प्रणालीचा (GIS) वापर केला जाईल.
रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती’ (DMC) गठीत करण्यात आली आहे.
​ जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची रचना
​अध्यक्ष: जिल्हाधिकारी
​सह-अध्यक्ष: जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी
​सदस्य:
​मुख्यधिकारी, सर्व नगरपालिका/नगरपरिषद
​विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), रत्नागिरी (चिपळूण)
​उप जिल्हाधिकारी (रोहयो)
​जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख
​जिल्हा नियोजन अधिकारी
​प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास (पेण, रायगड)
​जिल्हा कृषी अधिकारी
​जिल्हा माहिती अधिकारी
​सदस्य – सचिव: विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग
​समितीची मुख्य कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या
​गठित करण्यात आलेली समिती जिल्ह्यात खालील प्रमुख घटकांवर काम करणार आहे:
​लँड बँक तयार करणे: जिल्ह्यातील महसूल, वन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंपदा व इतर शासकीय संस्थांकडील लागवडी योग्य जमिनीची जीआयएस (GIS) आधारित नोंदणी करून ‘लँड बँक’ तयार व अद्ययावत करणे. माती, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता आणि अतिक्रमणाची स्थिती तपासून जमिनीचे वर्गीकरण करणे व मान्सूननिहाय लागवड आराखडा तयार करणे.
​ वृक्षारोपणासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे, निधीचे वितरण आणि रोपे, खत, कुंपण व पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) आणि सीएसआर (CSR) माध्यमातून विविध संस्थांना मोहिमेत जोडून घेणे.
​ वृक्षलागवडीनंतर पुढील १० वर्षांपर्यंत कुंपण, देखभाल, तणनियंत्रण आणि पाणी पुरवठा करून रोपे जगवण्याची जबाबदारी निश्चित करणे.
​डिजिटल मॉनिटरिंग व ऑडिट: जिओ-टॅगिंग, फोटो अपलोड आणि सॅटेलाइट सर्वेक्षणाद्वारे रोपांच्या जिवंत राहण्याचे प्रमाण मोजणे व त्रयस्थ यंत्रणेमार्फत गुणवत्ता नियंत्रण करणे.
​ दुष्काळ, कीड व आगीपासून संरक्षणासाठी आपत्कालीन आराखडा तयार करणे. विशेषतः वनव्याचे प्रमाण एकूण वनक्षेत्राच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील याची दक्षता घेणे.
​ ग्रामपंचायती, स्वयं सहाय्यता गट (SHG) आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने व्यापक जनआंदोलन उभे करणे.
​या मोहिमेच्या संदर्भात समितीची दरमहा आढावा बैठक घेतली जाणार असून, प्रगतीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button