
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या २२ वर्षीय नवोदित इंजिनिअरचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू
मेढे मांजरेतील जांभळी बंदरावर दुर्घटना; २४ तासांच्या शोधमोहीमेनंतर NDRF पथकाने शोधला मृतदेह
संगमेश्वर,- गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय नवोदित इंजिनिअरचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे मांजरे येथील जांभळी बंदरावर घडली. अथर्व राजेश देसाई (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोहता येत नसतानाही खाडीच्या पाण्यात उतरल्याने आणि त्यावेळी सुरू असलेल्या ओहोटीच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्घटना घडली. तब्बल २४ तासांच्या शोधमोहीमेनंतर मंगळवारी सायंकाळी NDRF पथकाला अथर्वचा मृतदेह शोधण्यात यश आले.
मुंबईत वास्तव्यास असलेला अथर्व गणेशोत्सवासाठी आपल्या पालकांसह मेढे मांजरे-कळकदेकोंड येथे गावी आला होता. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो मुंबईहून आलेल्या आपल्या मित्रांसोबत जांभळी बंदरावर गेला. यावेळी खाडीत ओहोटी सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह वेगवान होता. मित्रांपैकी कोणालाही उत्तम पोहता येत नव्हते, तर अथर्वला पोहता येत नसतानाही त्याने पाण्यात उडी घेतली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात अथर्व बुडू लागल्याचे लक्षात येताच त्याचे मित्र घाबरले. त्यांनी तातडीने वाडीत धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्वरित खाडीत उतरून शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र वाढता अंधार आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे शोधमोहीमेला अडथळे निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच डिंगणी दूरक्षेत्र आणि संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने होड्यांच्या साहाय्याने रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र अथर्वचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी तत्काळ NDRF पथकाला घटनास्थळी पाचारण केले. मंगळवारी NDRFच्या दोन पथकांनी खाडीत व्यापक शोधमोहीम राबवली. अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह पथकाच्या हाती लागला.
अथर्व नुकताच इंजिनिअर झाला होता. अभ्यासासोबतच तो खेळातही हुशार असल्याने त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका तरुण, होतकरू इंजिनिअरचा गणेशोत्सवाच्या काळातच दुर्दैवी अंत झाल्याने मेढे मांजरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
धोकादायक पाणवठ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
पावसाळ्यात अचानक वाढणारी पाण्याची पातळी, नदी-खाडीतील भरती-ओहोटी आणि वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते. स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याचा अंदाज नसताना मुंबईसह अन्य शहरांतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी तसेच पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरू नये, असे आवाहन रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.




