
नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन स्वा. वि. दा.सावरकर नाट्यगृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करून मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर वर्षभरातील दिवंगत रंगकर्मी यांना श्रद्धांजली वाहून नंतर कार्यक्रम सुरूवात झाली.
नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य अनुया बाम यांनी रंगभूमी दिनावर आधारित तयार केलेली कविता वाचून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखेचे माजी अध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा वणजू यांचा सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद गानू यांचा सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार नाट्य परिषदेचे जेष्ठ कार्यकारिणी सदस्य सुधाकर बेहेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी आप्पा वणजू यांनी नाट्य परिषदेची रत्नागिरी शाखा सन १९७५ मध्ये सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंतचा शाखेचा शाखेच्या कार्याचा आढावा घेतला.
श्री. गानू यांनी अलंकार थियेटर रत्नागिरी आणि स्टार थियेटर रत्नागिरी या संस्थांमधून अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये साकार केलेल्या भूमिकांविषयी, नाटकांविषयी आणि त्या काळातील रंगकर्मी विषयी आपल्या आठवणी सांगितल्या.
नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पूजा जोशी यांनी अत्यंत सुंदर असा एकपात्री सादर केला. तसेच सुधाकर बेहेरे आणि अशोक उपाध्ये यांनी देखील उत्स्फूर्तपणे एकपात्री अभिनयाचे सादरीकरण केले.
या प्रसंगी गोगटे जोगळेकर कॉलेजमधील परफॉर्मिंग आर्टच्या विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला विविध नृत्यांचा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. याप्रसंगी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना युवा महोत्सवामध्ये मिळालेल्या यशाबद्दल नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या कार्यकारिणीने विशेष नियोजन करून या कार्यक्रमाची आखणी केली होती. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी नाट्यगृहाचे कर्मचारी यांनी देखील विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन राकेश बेर्डे (बुवा) यांनी
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वामन कदम यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.




