निवडणूक अर्ज भरताना रोखले, धमकावले! विधानसभाध्यक्ष नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल; पालिका आयुक्तांकडून मागवला अहवाल!!


मुंबई : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावले, रोखल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यास न मिळालेल्या या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून यापक्ररणी आयोगाकडून महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कुलाबा येथे घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रणही मागविण्यात आले आहे.

महापालिका निवडणूकीसाठी ३० डिसेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ या तीन प्रभागातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करतेवेळी राहूल नार्वेकर हेही उपस्थित होते.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी अन्य उमेदवारांनाही अर्ज दाखल करायचे होते मात्र पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. यावेळी नार्वेकरांकडूनच पोलिसांवर दबाव आणण्यात आला व या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या नार्वेकर यांचे वागणे असंविधानिक असल्याचा आरोप राठोड यांच्याकडून करण्यात आला. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे तक्रार केली.

शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही हा आरोप सत्य असल्याचे म्हटले. नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी निष्पक्ष राहणे अपेक्षित असताना ते घरातील उमेदवारांचे अर्ज भरायला गेले, यापूर्वी असे कधी पाहिले नव्हते ते असे ते म्हणाले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवणार

राज्य निवडणूक आयोगाने विरोधकांच्या या तक्रारींची दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. सभागृहात अर्ज दाखल करतानाचा उमेदवारांचा व्हिडिओ, उमेदवारांसोबत कोणकोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर कशासाठी आले होते, नार्वेकर यांनी खरोखरच उमेदवारांना धमकावले काय, तसे असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कोणती खबरदारी घेतली, नसेल तर कार्यवाही का केली नाही आदी मुद्दे विचारात घेतले जाऊन त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

विरोधकांचा रडीचा डाव – राहुल नार्वेकर

यावर स्पष्टीकरण देताना राहुल नार्वेकर यांनी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आत घेण्यात आले होते. जे वेळेत आले नाहीत. त्यांना अर्ज भरता आले नाहीत. २१२ प्रभागातील भाजपच्याच उमेदवाराला अर्ज भरता आला नाही. पण ज्यांना रडीचा डाव खेळायचा आहे ते अशी कारणे देत आहेत. ज्यांना १-२ वाजता पक्षाकडून अर्ज देण्यात आले ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कसे अर्ज भरू शकतात असा सवाल करताना ही चूक पक्षाची आहे, असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button