
सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘जेल पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबवण्याची आमदार दीपक केसरकर यांची मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्हा कारागृहे आहेत. पैकी एक ब्रिटिशकालीन सर्वात जुने जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे असून दुसरे सिंधुदुर्गनगरी येथे अलीकडेच उभारण्यात आले आहे.जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे, त्यामुळे सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘जेल पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबवता येऊ शकते, त्याने जिल्ह्याच्या पर्यटनला एक नवी दिशा मिळेल, असे मत रविवारी आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. केसरकर यांनी ‘जेल पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी दर पाहता, सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे 150 वर्षांपूर्वीचे असून ते आता रिकामे झाले आहे.



