
‘बालकांचे हक्क व कायदे’ यावर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि होप फॉर द् चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी, दि. 21 ) : महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित नियम २०१८ नुसार बालकांसंबंधित काम करणाऱ्या बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन यांच्याकरिता बालकांचे हक्क व कायदे या विषयावर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि होप फॉर द् चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी वंदना जैन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, मुख्य संचालन अधिकारी शकिल शेख, सदस्य – बाल कल्याण समितीचे अॕड. रजनी सरदेसाई, अॕड. प्रिया उमेश लोवलेकर व शिरीष दामले, बाल न्याय मंडळाचे सदस्य अॕड. विनया संकेत घाग, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील बाल कल्याण पोलीस अधिकारी व विशेष बाल पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन १०९८ यांना या प्रशिक्षणात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत नियम २०१८ नुसार विधीसंघर्षग्रस्त बालके व काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासोबत अनुसरावयाची कार्यपध्दती तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ या विषयी माहिती देण्यात आली. बाल न्याय अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने उपस्थित प्रशिक्षणार्थी सर्व पोलीस अधिकारी यांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोग, मुंबई व होप फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्यामार्फत तज्ञ साधन व्यक्ती (प्रशिक्षक) अॅड. परम आनंद, होप फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशनचे वसीम शेख, होप फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशनचे सचिन करंजुळे यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षणार्थी यांना माहिती दिली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी / कर्मचारी, चाईल्ड हेल्प लाईन मधील सर्व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील कायदासाथी यांचीही उपस्थिती होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
000



