
संगमेश्वरातील तीन दुकाने फोडणारा चोरटा भुकेला निघाला ,दुकाने फोडून चक्क बिर्याणी व आईस्क्रीम खाल्ले
संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळील देवरुख मार्गावर अज्ञात चोरट्याने बुधवारी मध्यरात्रीनंतर तीन दुकाने फोडून चोरी केली. या घटनेत चोरट्याने मोबाईल दुकानातून सुमारे ५१ हजार ४९९ रुपयांचा माल लंपास केला असून, कोल्ड्रिंक्स दुकान आणि हॉटेलमध्ये किरकोळ चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोबाईल दुकानदाराने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून देवरुखकडे जाणाऱ्या मार्गावर साईराज कोल्ड्रिंक्स, दत्त कृपा मोबाईल दुकान (मालक राजेश तुकाराम आंबवकर) आणि अलिशान बिर्याणी हॉटेल अशी दुकाने आहेत. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या तिन्ही दुकानांच्या शटरचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. गुरुवारी सकाळी दुकानदार नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे उघड झाले.
साईराज कोल्ड्रिंक्सचे मालक संदेश कापडी यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, चोरटा कुलूप तोडून आत येताना, किरकोळ पैसे घेऊन बाहेर पडताना आणि जाताना दोन आईस्क्रीम घेऊन दुकानातून बाहेर जाताना दिसून आला. त्यानंतर त्याने शटर बंद केलेलेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते.
यानंतर त्याने दत्त कृपा मोबाईल दुकानात प्रवेश करून, सुमारे ५१ हजार ४९९ रुपयांचा मोबाईल आणि साहित्य लंपास केला. त्यामध्ये विवो, सॅमसंग आणि ओपो या कंपन्यांचे मोबाईल हँडसेट तसेच अन्य साहित्याचा समावेश आहे. चोरट्याने कुलूप फोडण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी आणि पाना घटनास्थळीच सोडली होती. विशेष म्हणजे त्याने आधी घेतलेले आईस्क्रीम तेथेच खाल्ले असून रिकामे डबेही तिथेच आढळले.
अलिशान बिर्याणी हॉटेलमध्ये चोरट्याने मागील बाजूने जाळी तोडून आत प्रवेश केला आणि तिथे असलेली बिर्याणी खाल्लीच नाही तर जाताना काही सोबतही नेल्याचे समजते. किरकोळ रकमेवरही त्याने हात मारला.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तपास करण्यासाठी ‘माही’ नावाच्या श्वानपथकाला बोलावण्यात आले. श्वानाने चोरट्याचा माग घेत बसस्थानकापर्यंत व नंतर महामार्गाच्या दिशेने हालचाल केल्याचे आढळले. त्यामुळे चोरट्याने पुढील प्रवासासाठी वाहनाचा वापर केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.




