मालवण नांदोस येथील जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळला, कौटुंबिक समस्येतून आत्महत्या


मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडी येथील जंगलमय भागात सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंह थापा याचाच असल्याची माहिती त्याचा मावस भाऊ योग बहादूर छेत्री याने पोलिसांना दिली आहे.कौटुंबिक समस्येतून प्रदीप सिंह थापाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
शनिवारी नांदोस सुतारवाडी येथील जंगलात वडाच्या झाडाखाली एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला होता. मृतदेहाशेजारी निळ्या रंगाची हाफ पँट, पांढरी चप्पल, टी-शर्ट, मोबाईल, घड्याळ, ओळखपत्र आणि काही नोटा पोलिसांना सापडल्या होत्या. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हा मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंह थापा याचा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. या शोधमोहिमेदरम्यान प्रदीप सिंहचा मावस भाऊ योग बहादूर छेत्री हा वैभववाडी येथे राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी योग बहादूर छेत्रीशी संपर्क साधला होता.

आज योग बहादूर छेत्री मालवण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल, घड्याळ, कपडे आणि इतर वस्तू प्रदीप सिंह थापा यांच्या असल्याचे ओळखले आणि मृतदेह प्रदीप सिंहचाच असल्याची खात्री केली.
पोलिसांनी योग बहादूर छेत्रीकडे केलेल्या अधिक चौकशीत प्रदीप सिंह थापा कौटुंबिक समस्येमुळे मानसिक दबावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप सिंह मालवण कट्टा येथील एका चायनीज सेंटरमध्ये कुक म्हणून काम करत होता आणि त्याची एक कुक म्हणून ख्याती होती. त्याला रोज पगार मिळत असे. काही दिवसांपासून तो अचानक बेपत्ता झाला होता आणि याबाबतची खबर पोलिसांत दाखल होती. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहाच्या हाडांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या तपासणीतून त्याला मारहाण झाली होती का, याची पडताळणी केली जाईल. मालवण पोलिसांनी प्रदीप सिंह थापाने कौटुंबिक समस्येच्या ताणतणावातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मालवण पोलिस निरीक्षक मारूती जगताप अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button