
श्री संत तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान: देहूत भक्तांची अलोट गर्दी,
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज देहूतून प्रारंभ होणार आहे. यंदाचा हा ३४० वा पालखी सोहळा असून, या निमित्ताने देहू नगरीत पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. आज पहाटे ४.३० वाजल्यापासूनच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.शिळा मंदिरामध्ये अभिषेक झाल्यानंतर, स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक आणि संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक व पूजा करण्यात आली.
आज पहाटे ५.०० वाजता महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ७.०० वाजता नारायण महाराज यांच्या समाधीची विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ९.०० ते ११.०० वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.०० ते १२.०० वाजता यावेळेत काल्याचे कीर्तन पार पडणार आहे. तर दुपारी २.०० वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली