
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील वातानुकूलित विश्रामगृहाच्या रिसेप्शन टेबलमधील रोख 25 हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील वातानुकूलित विश्रामगृहाच्या रिसेप्शन टेबलमधील रोख 25 हजार रुपये असलेला चोरीस गेलेला डबा चोरट्यासह काही तासातच पोलिसांच्या ताब्यात मिळाला आणि मुद्देमाल जप्त करून चोरट्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.ही घटना शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 8.55 वा.सुमारास घडली होती.
याबाबत तेथील कर्मचारी सदफ फकीर मोहम्मद शेख (38, रा. मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्या रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील वातानुकूलित विश्रामगृह येथे नोकरीला आहेत. शुक्रवारी सकाळी त्या आपल्या ड्युटीवर हजर असताना त्यांना तेथील रिसेप्शन टेबलमधील रोख 25 हजार रुपये असलेला डबा चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आजुबाजुला पैशांच्या डब्याचा शोध घेतला परंतू तो सापडला नाही. याची माहिती जवळच असलेल्या कुवारबाव पोलीस चौकीतील पोलीस हवालदार संतोष गायकवाड, महेंद्र खापरे आणि राकेश तटकरी यांना समजली. ते तत्काळ रेल्वे स्टेशनच्या वातानुकूलित विश्रामगृहामध्ये दाखल झाले. त्यांनी रिसेप्शन काउंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासलं, त्यावेळी संशयित आरोपीच्या अंगावरील कपडे आणि त्याचा पेहराव त्यांनी हेरला आणि त्याच वेळेला हा संशयित रेल्वे स्थानका बाहेर असलेल्या रिक्षात बसल्याचे निष्पन्न झालं.
त्यानंतर याची माहिती रत्नागिरी शहर निरीक्षक सतीश शिवरकर यांना दिल्यानंतर डिटेक्शन टीमचे सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार अरुण चाळके, निलेश कांबळे आणि चालक पोलिस हवालदार ओमकार सावंत यांनी या रिक्षाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. एसटी स्टँड येथे ही रिक्षा आल्यानंतर या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं.
तेजस अजित छाबडा (रा. इगतपुरी लोहिया रोड, नाशिक) याला डिटेक्शन टीमने ताब्यात घेतलं. त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्याकडून चोरलेले 25 हजार रुपये सुद्धा हस्तगत करण्यात आले आहेत.