
बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून धडक दिलेला दुचाकीस्वाराचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
_पालीनजीक मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर २२ मार्च रोजी रात्री बांबरफाट्या नजीक महामार्गावर बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून दुचाकी स्वाराने जाऊन दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या स्वाराचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती पोलिसानी सुरळीत केली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. पाली विभागात नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यावर हा अपघात झाल्याने सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे.या अपघातासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार ता.२२ मार्च रोजी मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाली गावच्या हद्दीत बांबरफाट्या नजीक पाली ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजूला चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या नवीन महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर क्रमांक जीजे १२ बीझेड ४२४८ हा बंद पडल्याने चालक राहुल यादव याने रस्त्यावरच उभा करून ठेवलेला होता. याचदरम्यान रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान पालीवरून खानूच्या दिशेने एक्टिवा दुचाकी क्रमांक एमएच ०८ एडी ३५४० घेऊन जाणारा संदीप भिवा सुवारे वय ४५, रा.खानू, ता.जि.रत्नागिरी हा या बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडकून झालेल्या अपघातामध्येडोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी नजीकच्या पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अधिक उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले असता तो मयत झाला.www.konkantoday.com




