
माजी आमदार सदानंद चव्हाण यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड
चिपळूण : माजी आमदार सदानंद चव्हाण यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली आहे. रत्नागिरी येथील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवड जाहीर केली. यामुळे आता उत्तर रत्नागिरीत बाळासाहेबांची शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग येणार आहे.
येथील माजी आ. चव्हाण हे दोनवेळा चिपळूण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून विजयी झाले होते. तिसर्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांनी त्यांचा पराभव केला. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. याशिवाय त्यांनी सूचवलेल्या विकासकामांना विकास निधी देखील मिळाला नाही. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम यांनी भरघोस निधी आणला. शेवटी बाळासाहेबांच्या शिवसेनेत चव्हाण दाखल झाले.
शिवसेनेच्या बहुतांशी कार्यकर्त्यानी माजी आ. चव्हाण यांना समर्थन दिले आहे तर काही काठावर देखील आहेत. त्यामुळे चव्हाण यांना उपनेतेपद मिळाल्याने उत्तर रत्नागिरीसह जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
या बाबत चव्हाण म्हणाले, मी शिवसेनेचा दोनवेळा आमदार होतो. तिसर्यावेळी आपला पराभव झाला. चिपळुणातून पक्षांतर झाल्यानंतर आपण संघटना उभी केली. मात्र, पराभव झाल्यानंतर आपले संघटन कौशल्य आहे की नाही याची कोणाला कल्पना आली नाही. ही निवड आपण सार्थ ठरवू. आता आपल्याला खर्या अर्थाने काम करण्याची संधी आहे. तालुका प्रमुखानंतर आमदार झालो. मात्र त्यापुढचे पद मिळाले नव्हते. आता तालुकाप्रमुख पदानंतर संघटनेचा उपनेता झालो आहे. त्यामुळे निश्चीत आपण यापदाचा मान उंचावण्यासाठी काम करू, असे चव्हाण यांनी सांगितले.