
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची उदय सामंत यांच्याशी सदिच्छा भेट
मुंबई : १०० व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संमेलनाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
मराठी साहित्याच्या प्रवाहात समाजातील सर्व घटकांना समान स्थान मिळाले पाहिजे, या विचारातून सुरू झालेला प्रवास आज एका वंचित घटकातून आलेल्या साहित्यिकाच्या गळ्यात १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा साहित्यविश्वातील ‘काव्यगत न्याय’ असल्याचे मत ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
समाजातील विविध घटकांमध्ये संवाद निर्माण व्हावा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वदूर पोहोचावा, यासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य साहित्य आणि वैचारिक चळवळीला समर्पित केले आहे. त्यांच्या साहित्याचा जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला असून, त्यांनी विविध देशांमध्ये व्याख्याने देत मराठी साहित्य आणि आंबेडकरी विचाराची व्यापक ओळख निर्माण केली आहे.
अशा जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाची १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षपदामुळे मराठी साहित्य संमेलनाच्या शताब्दी सोहळ्याला सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा नवा आयाम प्राप्त झाला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.



