
गोवा महामार्गावरील आंजणारी घाट ते पूल या परिसरात होणाऱ्या अपघात नवे गतिरोधक रोखणार
गोवा महामार्गावरील आंजणारी घाट ते पूल या परिसरातील अपघाताची मालिका रोखण्यासाठी मठ जाकादेवी हॉटेल ते आंजणारी पुलापर्यंतच्या अंतरामध्ये नव्याने १८ गतिरोधक बसविण्यात आले आहेत.रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन सेफ’ अंतर्गत अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी केल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने रत्नागिरी पोलीस प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती. या पाहणीमध्ये लांजा तालुक्यातील आंजणारी परिसरातील अपघातांची परिस्थिती विशेषतः लक्षात घेण्यात आली.आंजणारी परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी यापूर्वी सात गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र, अपघातांची तीव्रता लक्षात घेऊन आणखी गतिरोधक बसविण्याची आवश्यकता असल्याने त्यानुसार अपघात रोखण्यासाठी पाउल उचलत राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस प्रशासनाने ठेकेदार कंपनीला नवीन गतिरोधक उभारण्याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी करत जाकादेवी हॉटेल ते आंजणारी पुलापर्यंत नवीन १८ गतिरोधक बसविण्यात आले आहेत.




