
वणवे रोखण्यासाठी वनविभागाला प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश; मंत्री योगेश कदम अधिकाऱ्यांवर नाराज!
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलांमध्ये वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वणवे रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात या प्रशिक्षणाची अंमलबजावणी होताना दिसत नाही, याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शनिवारी खेड नगर परिषदेला भेट देऊन शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. नगर परिषद सभागृहात आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खेड शहरातील रस्त्याचे रुंदीकरण, रखडलेले क्रीडा संकुल, पोलीस भरतीसाठी मोफत सराव मैदाने आणि जंगलातील वणवे अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रत्नागिरी जिल्ह्यात वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना मंत्री कदम म्हणाले की, काही ठिकाणी जाणूनबुजून वणवे लावले जातात, तर काही ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे जंगलांना आग लागते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वणवे रोखण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. मात्र, या प्रशिक्षणानुसार प्रत्यक्ष क्षेत्रात उपाययोजना होताना दिसत नाहीत. याबाबत आपण यापूर्वी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
उष्णता वाढण्याच्या काळात वणव्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जंगलांमध्ये आग पसरू नये यासाठी आवश्यक ठिकाणी ट्रेंचेस (चर) खोदणे, प्रतिबंधात्मक खंदक तयार करणे आणि अन्य आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. मानवी हस्तक्षेपातून जाणूनबुजून लावले जाणारे वणवे पूर्णपणे रोखणे कठीण असले, तरी नैसर्गिकरीत्या आग पसरण्यापासून रोखण्यासाठी उपलब्ध उपाययोजनांचा प्रभावी वापर झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे काम रखडल्याबाबत मंत्री कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामातील तांत्रिक अडचणी आपण दूर केल्या असून, आता काम रखडण्यामागे ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
या कामाबाबत आपण अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत स्वतः क्रीडा संकुलाला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहे. आता या कामाला मुदतवाढ दिली जाणार नाही. ठेकेदाराला नियमानुसार जो काही दंड आकारणे आवश्यक आहे, तो आकारला जाईल आणि त्याची वसुलीही केली जाईल. काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
खेड शहरातील रस्त्याचे सुरू असलेले काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात नळपाणी योजनेचे काम आणि रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू असल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, विकास आराखड्यात (डीपी) नमूद केलेल्या रुंदीनुसारच रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जवळपास ९९ टक्के तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात आला आहे. उर्वरित अडचणीही दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याचे काम करताना नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण व्हावे, याला प्राधान्य दिले जात आहे. आजची बैठक सकारात्मक आणि यशस्वी झाली असून डीपीमध्ये निश्चित केलेल्या रुंदीनुसार रस्ता पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
विकासकामांचा आढावा घेताना रखडलेल्या प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची भूमिका, ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा आणि वणवे रोखण्यासाठी वनविभागाला दिलेले निर्देश यामुळे मंत्री योगेश कदम यांचा पत्रकार परिषदेतला संवाद महत्त्वपूर्ण ठरला.




