मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद; चौघांना अटक

वाहनासह तीन बॅटऱ्या जप्त; ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी ते चिपळूणदरम्यान गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. संशयावरून एका वाहनाची तपासणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी वाहनासह मोबाईल टॉवरच्या तीन बॅटऱ्या असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (वय ३२), नवनाथ भगवान उतेकर (वय ३६), कोशिष प्रभाकर जाधव (वय २७, तिघेही रा. विरार पूर्व, जि. पालघर) आणि मंगेश मनोज गुरव (वय २०, रा. नालासोपारा, जि. पालघर) यांचा समावेश आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी ते चिपळूणदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत होते. यावेळी एक संशयास्पद वाहन आढळून आल्याने पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली. या तपासणीत मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील वाहन आणि तीन बॅटऱ्या जप्त केल्या.

या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button