
चिपळूणमध्ये ६ कोटी ८३ लाखांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तीन ठिकाणी भूमिपूजन सोहळे; रस्ते आणि पुलांच्या कामांचा समावेश
चिपळूण : चिपळूण परिसरातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून मंजूर झालेल्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या तीनही कामांसाठी एकूण ६ कोटी ८३ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली असून, आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत दुपारी १२ वाजता चिपळूण–गुहागर बायपास रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या कामासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता पिंपळी–नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा होणार असून, यासाठी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन होणार आहे. या कामासाठी ४ कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे.
या तीनही विकासकामांमुळे संबंधित परिसरातील रस्ते वाहतूक आणि पुलांची सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजन समारंभाला महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




