चिपळुणात मंगळवारी ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिरात त्रिपुरारी दीपोत्सव

शहरासह पाच धार्मिक स्थळांवर दीपोत्सवाचे आयोजन; भाविकांना दर्शनाचे आवाहन

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत आणि सुप्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या श्री देव जुना कालभैरव देवस्थान येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त श्री ग्रामदैवत जुना कालभैरव-श्री देवी योगेश्वरी मंदिरात सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत दीपोत्सव होणार आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या अन्य धार्मिक स्थळांवरही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये वैश्य वसाहत येथील श्री देव केदार-श्री देवी जाखमाता मंदिर, वडनाका येथील श्री देवी ऐकविरा मंदिर, श्री क्षेत्र गांधारेश्वर येथील श्री गांधारेश्वर मंदिर आणि मुरादपूर येथील श्री भवानी मंदिर यांचा समावेश आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरातील विविध धार्मिक स्थळांवर दीपोत्सवाची परंपरा जपली जाणार असून, भाविकांनी या उत्सवाची नोंद घेऊन संबंधित मंदिरांमध्ये श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button