
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव पिकअपची पादचाऱ्याला धडक; अनोळखी इसमाचा मृत्यू
खेड तालुक्यातील कशेडी-ओझरवाडी परिसरातील घटना; चालकाविरोधात गुन्हा दाखल
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी ओझरवाडी परिसरात भरधाव पिकअप गाडीने रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या एका अनोळखी इसमाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. मृत इसमाचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ओझरवाडी परिसरातून एक अनोळखी पुरुष पायी जात होता. याचवेळी एमएच ०८ बीके ०९५४ क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी घेऊन जाणाऱ्या चालक नितीन सदाशिव कदम (वय ३७, रा. खडपोली कदमवाडी, ता. खेड) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन निष्काळजीपणे चालविले. यावेळी पिकअपची पादचाऱ्याला जोरदार धडक बसली.
या अपघातात संबंधित इसमाच्या डोक्याला, पोटाला तसेच दोन्ही पायांना गंभीर व इतर दुखापती झाल्या. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कशेडी येथील पोलीस पाटील स्वरा समीर गावणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताची नोंद शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४८ वाजता करण्यात आली असून मृत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



