
निरबाडे ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन उत्साहात
निरबाडे : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते निरबाडे ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्यासह सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही इमारत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य मेघा इंगावले, संजय कदम, निलेश कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी निरबाडे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. नवीन ग्रामसचिवालयाची इमारत ही केवळ प्रशासकीय इमारत नसून गावाच्या विकासाचे केंद्र ठरणार आहे. ग्रामस्थांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रामसचिवालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून, या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पाली-निरबाडे रस्ता आणि पुलाचा प्रश्न आगामी अर्थसंकल्पीय तरतुदीतून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक आणि पंचायत समिती सदस्यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांचा आढावा घेतला. नवीन ग्रामसचिवालयामुळे ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे आणि प्रशासकीय कामकाज करणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला अजय महाडिक, बाबा महाडिक, महेश महाडिक, रोहन महाडिक, पप्या महाडिक, थोरे गुरुजी, महेंद्र थोरे, राजेंद्र महाडिक, परेल मॅडम, सचिन वाईल, केळसकर, अभियंता आरेकर, अप्पा महाडिक, दर्शना महाडिक, कविता महाडिक, मैनू सकावरे यांच्यासह विविध मान्यवर, मोहल्ल्यातील व राजवाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा महाडिक यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार मानले.




