निवृत्तीवेतनधारकांसाठी पाचवी राष्ट्रव्यापी ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ मोहीम सुरू ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत


रत्नागिरी, दि. १३ ):- केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागामार्फत देशभरात ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम राबवली जात आहे. याद्वारे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे अधिक सुलभ झाले आहे.
जिल्ह्यातील सुमारे १४ हजार ५०० निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
घरबसल्या डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सोय
शासकीय निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असते. पूर्वी यासाठी बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागत असे. मात्र, आता अँड्रॉइड मोबाईलद्वारे जीवन प्रमाण फेस ॲप(Jeevan Pramaan Face App) आणि आधार फेस आरडी (AadhaarFaceRd) ॲप डाऊनलोड करून डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करून ऑनलाइन सादर करता येते. केंद्र सरकारच्या या डिजिटल प्रणालीमुळे ज्येष्ठ नागरिकांची कार्यालयात जाण्याची गरज टळली असून, घरबसल्या हयातीचा दाखला सादर करणे शक्य झाले आहे.
आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन
डिजिटल प्रमाणपत्र सादर करताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदवणे आवश्यक आहे. तसेच वितरण संस्था व कोषागार निवृत्तीवेतन नोंदणीमध्ये ‘Digital Life Certificate’ ही नोंद अचूक असावी.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवृत्तीवेतनधारकांनी स्वतः ‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे डिजिटल प्रमाणपत्रे सादर करावीत किंवा संबंधित बँकेची शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयाच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button