विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथील घटना; बचाव पथकाच्या तत्परतेमुळे हरणाला जीवदान

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे आंबा-काजू बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वनविभागाच्या बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली. हरणाची वैद्यकीय व शारीरिक स्थिती तपासल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या या तत्परतेमुळे दुर्मिळ वन्यप्राण्याला जीवदान मिळाले आहे.
शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत सुर्वे यांनी वनविभागाचे वनपाल एस. एस. सावंत यांना माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर), वनरक्षक कृष्णा इरमले (कोळकेवाडी) आणि आरआरटी (RRT) पथकाचे सदस्य अथर्व घाग यांचा समावेश होता. विहिरीत पडलेल्या प्राण्याची पाहणी केली असता, तो ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरीण (Mouse Deer) असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर बचाव पथकाने हरणाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. मात्र, बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने अथक प्रयत्न करून त्याला सुरक्षितपणे पकडले आणि पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर त्याची वैद्यकीय व शारीरिक तपासणी करण्यात आली. हरीण सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button