खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

रत्नागिरी, दि. ८ : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणार्‍या आणि भक्ती संगीत व नाट्य संगीत तितक्याच ताकदीने गाणार्‍या आणि गणितबद्ध व लयीशी खेळणारी सरगम शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल यंदा रंगणार आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रायोजकत्व लाभलेली ही मैफल मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2026 या दिवशी सायंकाळी 6 ते 8 या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालय, प-याची आळी, बाजारपेठ, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

मूळच्या आंबेजोगाई (बीड) येथील सांगीतिक वारसा लाभलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनावर मेवाती व किराणा घराण्याचा प्रभाव आहे. तसेच आग्रा आणि ग्वाल्हेर घराणे गायकीही त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांचे शास्त्रीय संगीतातील सुरवातीचे शिक्षण त्यांच्या आई- वडिलांकडे झाले. त्यानंतर पंडित अजय पोहनकर, पंडित सुरेश वाडकर व नंतर पंडित सुहासजी व्यास यांचेकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

त्यांनी ज्येष्ठ गायिका श्रीमती जयमाला शिलेदार यांच्याकडून नाट्यसंगीताचे मार्गदर्शन घेतले आहे. शास्त्रीय संगीतासोबतच उप-शास्त्रीय, भक्ती संगीत (भजन, अभंग) आणि नाट्यसंगीत या सर्वच प्रकारांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या आवाजात एक उपजत गोडवा आणि आर्तता आहे. जेव्हा त्या अभंग किंवा भजन गातात, तेव्हा त्यांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना उच्च प्रतीच्या ‘भक्तिरसाची’ अनुभूती मिळते. ‘भावरंग’ आणि ‘अभंग रंग’ हे त्यांचे सांगीतिक कार्यक्रम याच भावपूर्ण गायकीमुळे देश-विदेशात अत्यंत लोकप्रिय आहेत. शास्त्रीय गायनासाठी आवश्यक असणारे उत्तम श्वास नियंत्रण आणि आवाजाच्या पट्ट्यांचा अचूक वापर ही त्यांच्या गायकीची तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत.

गानहिरा, सूरमणी, संगीतरत्न, बाल सरस्वती व वीरांगना सावित्रीबाई फुले या नॅशनल पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. नवी दिल्ली, सिकंदराबाद, अंबेजोगाई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बिड, जबलपूर, नागपूर इत्यादी ठिकाणी तसेच अमेरिकेत त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

या कार्यक्रमाला तबला साथ- हेरंब जोगळेकर, हार्मोनियम साथ- श्रीरंग जोगळेकर, पखवाज साथ- कैलास दामले, व्हायोलिन साथ- उदय गोखले, तालवाद्य साथ- वर्धन ओळकर हे रत्नागिरीचे कसलेले कलावंत करणार आहेत. ही मैफल सर्व संगीत रसिकांना विनाशुल्क असून, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button