लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; ५० वर्षीय संशयिताला पळस्पे येथून अटक


दापोली (वार्ताहर) : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्यासह तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या दापोलीतील ५० वर्षीय संशयिताला दापोली पोलिसांच्या पथकाने पळस्पे येथून अटक करण्यात आली आहे.
संशयिताला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संशयित मुश्ताक गफार रखांगे (वय ५०, रा. काळकाई कोंड, दापोली) याने २०२२ पासून २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पीडितेने दिली होती. दापोलीतील संशयिताचे घर, पळस्पे, पुणे तसेच अलिबाग येथील हॉटेलमध्ये हे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कृत्यांना पीडितेने विरोध केला असता तिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते तसेच पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने (Zero FIR) दापोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६४(२)(m), ११५(२), ३५१(३), ३५२ आणि ८८ अन्वये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांच्या पथकाने संशयिताला पळस्पे ( जिल्हा रायगड ) येथून ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button