मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात सीपीआर प्रशिक्षण; रोटरी क्लबकडून दोन मॅनिकिन्स प्रदान

५० विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी घेतले जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण; आपत्कालीन प्रतिसादासाठी उपयुक्त उपक्रम

रत्नागिरी : हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने प्राथमिक उपचार देता यावेत, या उद्देशाने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे सीपीआर प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या आर्थिक सहकार्याने तंत्रनिकेतनाला दोन सीपीआर मॅनिकिन्स प्रदान करण्यात आले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डी. कोस्टा यांच्या हस्ते हे मॅनिकिन्स प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डी. कोस्टा यांचे स्वागत केले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर पालशेतकर, रोटरी ई क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सागर वाघमारे, प्राचार्य डॉ. केतन चौधरी आणि प्रमुख सीपीआर प्रशिक्षक रोटेरियन अनंत नागगौंडा यांचा सत्कार करण्यात आला.

दुर्गा महोत्सवानिमित्त आयोजित रील निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर दोन सीपीआर मॅनिकिन्स तंत्रनिकेतनाला प्रदान करण्यात आले.

हृदयक्रिया अचानक बंद पडलेल्या व्यक्तीला वेळेत योग्य सीपीआर दिल्यास तिचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने सीपीआरचे प्राथमिक ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे डॉ. संदीप करे, असिस्टंट गव्हर्नर पालशेतकर आणि लेनी डी. कोस्टा यांनी मनोगतात सांगितले.

कार्यक्रमानंतर सीपीआर प्रशिक्षणाचे तांत्रिक सत्र घेण्यात आले. यामध्ये ५० विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सीपीआर देण्याची योग्य पद्धत, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा सराव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नव्याने उपलब्ध झालेल्या मॅनिकिन्समुळे विद्यार्थ्यांना नियमित सरावाची सुविधा मिळणार आहे.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे पदाधिकारी तसेच तंत्रनिकेतनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी रोटरी क्लब आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डी. कोस्टा यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button