ल. ग. पटवर्धन शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारले आकाशकंदील, पणत्या आणि शुभेच्छा कार्ड – प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे-


रत्नागिरी:- येणाऱ्या दिवाळी सणाचे औचित्य साधून शहरातील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा कार्ड बनवणे, पणत्या रंगविणे आणि आकाशकंदील बनवणे हे उपक्रम आयोजित केले होते. विद्यार्थ्यांच्या हस्त कौशल्यातून तयार झालेल्या या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडून विक्री करण्यात आली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन यांचे हस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शिल्पाताई पटवर्धन यांनी छोट्या विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे व्यवहारज्ञान आजमावले. आकाश कंदील, पणत्या यांची खरेदीसुद्धा केली. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनीही विद्यार्थीनिर्मित आकाश कंदील, पणत्या यांची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीच बनविलेली शुभेच्छा कार्ड देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षक हणमंत ऐवळे, प्रज्ञा सुर्वे हेही उपस्थित होते.
त्यानंतर पालक बंधु – भगिनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पणत्या, आकाश कंदील व शुभेच्छा कार्ड यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लहान वयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळालेली संधी, त्याला व्यवहार ज्ञानाची जोड, खरेदी विक्रीचा अनुभव, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींमुळे हा उपक्रम खूपच छान झाला असे, मत पालक बंधु – भगिनींनी व्यक्त केले. अनेकांनी मुलांचे कौतुक करणारे अभिप्राय दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव दिल्यामुळे प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण मिळाले. निर्णय घेणे, संवाद साधणे, परस्पर सहकार्यभावना त्याचबरोबर आत्मविश्वास वाढणे या गोष्टींना या उपक्रमामुळे चालना मिळाली. मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिक्षक प्रवीण मोरे, अनिल गार्डी, छोटीराम सूर्यवंशी, नेहा राजेशिर्के, अमित वेदरे, दुर्वा भोरे, मनस्वी सनगरे, आद्या सावंत, वेदिका मेस्त्री, आर्या बंडागळे, श्रेया मांडवकर, विक्रांत भाटकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी वस्तूंच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button