दापोली-मंडणगड मार्गावर चिखलाचा विळखा, शिरखळनजीक अवजड वाहन चिखलात रूतल्याने वाहतुकीचा खोळंबा


दापोलीः- दापोली-मंडणगड मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचा आणि त्यातही नियोजनशून्य खोदकामाचा फटका आता वाहनचालकांना मोठया प्रमाणात बसू लागला आहे. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असतानाच दापोलीच्या दिशेने येणारा एक अवजड कंटेनर शिरखळनजिक चिखलात रूतून अडकला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. विशेषतः मुंबईहून दापोलीकडे येणाऱ्या प्रवाशांना आणि मुंबईकरांना या प्रकाराचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी कंटेनरला चिखलातून बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
दापोली-मंडणगड मार्गावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कामाचा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून ठेवल्याने वाहतुकीसाठी सुरक्षित जागा उरलेली नाही. त्यातच रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खोदलेल्या रस्त्यावर चिखलाचे थर साचले. परिणामी वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला. अशाच परिस्थितीत दापोलीकडे येणारा एक कंटेनर शिरखळनजीक चिखलात अडकला. अवजड वाहन चिखलात रूतल्याने त्याला बाहेर काढणे कठीण झाले आणि वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.
रात्रीच्या वेळी कंटेनर अडकल्याने दापोलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुंबईहून सुट्टी संपवून दापोलीकडे परतणाऱ्या अनेक मुंबईकरांना या खोळंब्याचा फटका बसला. आधीच चिखलमय झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण असताना कंटेनर अडकल्याने प्रवाशांची गैरसोय आणखी वाढली. प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना रस्त्यावर अडकून पडण्याची वेळ आली. सोमवारी सकाळी कंटेनरला चिखलातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर कंटेनर बाहेर काढण्यात यश आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र या घटनेमुळे रस्त्याच्या कामाचे नियोजन आणि पावसाळी परिस्थितीत वाहतुकीची सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
रस्त्याचे काँक्रीटीकरण होणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र काम सुरू असताना वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग ठेवण्याची जबाबदारी कोणाची? एका बाजूने काम सुरू असताना दुसरी बाजू वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवता आली असती. मात्र दोन्ही बाजूंनी खोदकाम करून ठेवल्याने पावसात संपूर्ण रस्ताच चिखलमय झाला आहे. याचा फटका दुचाकीस्वारांपासून अवजड वाहनांपर्यंत सर्वांनाच बसत आहे.
कंटेनर चिखलात अडकण्याची घटना ही केवळ एका वाहनाची अडचण नसून रस्त्याच्या कामातील नियोजनाच्या अभावाचे उदाहरण ठरत आहे. एखादे अवजड वाहन चिखलात अडकल्यानंतर वाहतूक खोळंबणार, प्रवाशांचे हाल होणार आणि नागरिकांनी तासनतास प्रतिक्षा करायची, ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेउन रस्त्यावरील चिखल हटवणे, वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे आणि पावसाच्या काळात आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत दापोली-मंडणगड मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अशाच संकटांचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली रस्ता खोदायचा आणि त्याच रस्त्यावर नागरिकांना चिखलात अडकवायचे, हा कोणता विकास? असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे.
फोटो डिपी 02-01 शिरखळ येथे चिखलात रूतल्याने अडकलेला अवजड ट्रक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button