
हापूसच्या पहिल्याच पेटीला ३६ हजारांचा मिळाला भाव
नवी मुंबई– दिवाळीच्या तोंडावर देवगड हापूसचा गोडवा बाजारात दाखल झाला आहे. देवगड तालुक्यातील गिरये रामेश्वर, येथून आलेल्या हापूसच्या पहिल्याच सहा डझनच्या पेटीला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईत तब्बल ३६ हजार रुपये भाव मिळाला. म्हणजेच एका आंब्याची विक्री ५०० रुपयांना झाली. यंदाच्या हंगामातील पहिली पेटी ३० ऑक्टोबरला दाखल झाली आहे.
देवगडचे शेतकरी मिलेश बांदकर यांच्या बागेतील ही आंबा पेटी आहे. जूनमध्ये मोहोर आल्यानंतर पावसामुळे गळू नये म्हणून काळजी घेतली. छप्पर उभारण्यासह बुरशी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यानंतर तयार सहा डझनची पेटी स्वतः बाजार समितीत आणली. अभिजीत भुजबळ यांच्या पेढीवर तिची विक्री झाली. प्रति डझन सहा हजार रुपये असा भाव मिळाला.
ऑक्टोबरमध्येच हापूसची पहिली पेटी दाखल झाली असली, तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळातील थंडी आणि उन्हाळ्याची तीव्रता यावर हापूसचा हंगाम अवलंबून राहणार आहे.



