
इस्रोची मोठी झेप! भारताचं ‘स्वदेशी GPS’ होणार शक्तिशाली, NVS-03 सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण; आता अचूक नेव्हिगेशन मिळणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जीएसएलव्ही-एफ१८ (GSLV-F18) प्रक्षेपकाच्या साहाय्याने आपल्या पुढच्या पिढीतील NVS-03 या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
भारताची स्वतःची स्वतंत्र उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली म्हणजेच नाविक (NavIC) अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इस्रोने यासंदर्भातील माहिती दिली.
हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरून शुक्रवारी रात्री ११:५१ वाजता झालं. प्रक्षेपणांनंतर सुमारे २० मिनिटांनी, GSLV प्रक्षेपकाने NVS-03 उपग्रहाला त्याच्या ठरलेल्या कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केलं. प्रक्षेपणावर लक्ष ठेवून असलेल्या इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी अत्यंत आनंदाने ही मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि या उपग्रहामागील अभियंतांचे अभिनंदन केले.
भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकलची ही २० वी भरारी होती. याने २ हजार २५० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) पोहचवला. NVS-03 हा इस्रोच्या दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह मालिकेतील तिसरा उपग्रह आहे. नाविक (NavIC) अंतर्गत नेव्हिगेशन सेवांचा सातत्यपूर्ण पुरवठा करणं आणि त्यांची उपलब्धता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. नागरी, व्यावसायिक आणि धोरणात्मक प्रयोगांसाठी उपग्रह-आधारित नेव्हिगेशन अत्यंत कळीचे बनले असताना, भारताची स्वतःची स्वतंत्र पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टाइमिंग क्षमता मजबूत करण्यासाठी ही मोहीम विशेष महत्त्वाची आहे.
NVS-03 भारतासाठी का महत्त्वाचा आहे?
नाविक ही अमेरिकेच्या जीपीएस (GPS) सारख्या नेव्हिगेशन प्रणालीला भारताने दिलेला एक स्वदेशी पर्याय आहे. ही प्रणाली मुख्य भारतीय भूभाग आणि देशाच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे साधारण १ हजार ५०० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्राला पोहोचेल अशा प्रकारे डिझाइन केली आहे. या प्रणालीचे रस्ते आणि सागरी नेव्हिगेशनपासून ते आपत्ती व्यवस्थापन, अचूक शेती आणि सशस्त्र दलांच्या धोरणात्मक मोहिमांपर्यंत अनेकविध उपयोग आहेत. अत्यंत महत्त्वाच्या नेव्हिगेशन तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी होण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून NVS-03 मध्ये आयात केलेल्या ॲटोमिक क्लॉक्ससोबतच (अणू घड्याळ) एक स्वदेशी ॲटोमिक क्लॉक देखील बसवण्यात आले आहे. तसंच, यामध्ये सध्याच्या L5 आणि S-बँड सिग्नल्ससह L1 फ्रिक्वेन्सी सिग्नलचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. L1 सिग्नलमुळे नेव्हिगेशन रिसीव्हर्स आणि ग्राहकांच्या मोबाईल व इतर उपकरणांसोबतची सुसंगतता सुधारेल, यामुळे नाविकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.




