
मध्य रेल्वेच्या कारभाराचे तीन बळी; दोघे जखमी!
मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल सेवेतील बिघाडामुळे सोमवारी प्रवाशांचे हाल झाले. लोकलच्या खोळंब्यादरम्यान घडलेल्या विविध घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. भांडुप स्थानकात रूळ ओलांडताना वातानुकूलित लोकलच्या धडकेत २१ वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा मृत्यू झाला. याशिवाय घाटकोपर-विक्रोळी स्थानकांदरम्यान दोन मृतदेह आढळले. लोकल विलंबाने धावत असल्याने रुळांवरून चालत जाणारे दोघे जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहणारा साहिल थिटे भांडुप येथील नाईट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. सोमवारी तो भांडुप स्थानकातील फलाट क्रमांक चारवर लोकल पकडण्यासाठी उभा होता. फलाट क्रमांक दोनवर लोकल येत असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर तेथे लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात त्याने रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी फलाट क्रमांक तीनच्या रुळांवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने वातानुकूलित लोकल धावत होती. या लोकलची धडक बसल्याने साहिल गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिसांनी अधिकाऱ्याने दिली.
घाटकोपर-विक्रोळीदरम्यान दोन मृतदेह
घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान दोन मृतदेह आढळले. राहुल राजभर (वय २५), खरबान राजभर (वय ४०) अशी मृतांची ओळख पटली आहे. मोटरमनला हे मृतदेह रुळांवर पडलेले दिसले, अशी माहिती रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली.
रुळांवरून चालताना दोघे जखमी
लोकल सेवेचे तीनतेरा वाजल्याने, अनेक प्रवाशांनी रुळांवरून चालत जाऊन जवळचे स्थानक गाठले. परंतु, यात दोन जण जखमी झाले. दोघांना राजावाडी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून मलमपट्टी करण्यात आली.




