
भ्रष्टाचार थांबवा, देश वाचवा! अभिनेते प्रशांत दामले यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
रत्नागिरी, दि. २७ ) : ‘भ्रष्टाचार हा विकासकामातील सर्वात मोठा अडथळा असून तो रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असा स्पष्ट संदेश प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी दिला आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या ‘जनजागृती सप्ताहा’च्या निमित्ताने त्यांनी नागरिकांना लाचखोरीविरोधात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
लाचखोरीविरोधात त्वरित तक्रार करण्याचे आवाहन
व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधताना प्रशांत दामले म्हणाले की, कोणत्याही विकासकामात लाचखोरीमुळे समाजाचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जर कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या नावाने मध्यस्थी करणारी कोणतीही खाजगी व्यक्ती पैशांच्या किंवा इतर कोणत्याही भेटवस्तूंच्या स्वरूपात लाचेची मागणी करत असेल, तर त्याबद्दल तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau – ACB) संपर्क साधावा.
ठाणे परिक्षेत्रासाठी संपर्क क्रमांक जारी
त्यांनी ठाणे परिक्षेत्रातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई या भागांतील नागरिकांना आवाहन करत सांगितले की, अशी लाच मागितली जात असल्यास त्वरित १०६४ (1064) या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’
“देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया; समृद्धीसाठी सत्यनिष्ठा बाळगूया आणि भ्रष्टाचार थांबवून देश वाचवूया,” असा संदेश देत त्यांनी आपल्या आवाहनाचा समारोप ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ने केला.




