औषध अस्सल की बनावट एका मिनिटात कळणार! महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या हाती ‘ड्रग डिटेक्शन मशीन’; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती!

Drug Detection Machine : सरकारी रुग्णालयांना पुरविले जाणारे औषध योग्य आहे की बनावट हे आता एका मिनिटात कळणार आहे. आरोग्य विभागाने औषध पडताळणी यंत्राची खरेदी केली असून राज्यातील आठ विभागांत हे ड्रग डिटेक्शन मशीन दिले जाणार आहे.

हे यंत्र औषध अस्सल आहे की बनावट आहे, हे मशीन मिनिटभरात शोधणार आहे. हे मशीन भरारी पथकांनाही देण्यात येणार असून त्या माध्यमातूनही औषध तपासणी होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच येत्या १ नोव्हेंबरपासून आपण राज्यभरात आरोग्य संवाद यात्रा काढणार आहोत. आरोग्य विभागाच्या वतीने जनसामान्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत कितपत पोचतात हे संवाद यात्रेच्या माध्यमातून जाणून घेण्यात येणार असल्याचे आबिटकर म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शेकडो कोटींची औषध खरेदी होत असते. ही औषधे जीवनरक्षक असतात. त्यात कोणतीही भेसळ असणे योग्य नाही. बनावट औषधे घेणे हे रुग्णांसाठी हानीकारक ठरत असते. त्यामुळे रुग्णांना मूळ, अस्सल औषधे मिळावीत यासाठी आपण पुढाकार घेऊन ड्रग डिटेक्शन मशिन घेण्याची योजना सुरू केल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

ही मशीन अगदी पोर्टेबल आहे. जगविख्यात नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांनी शोधलेल्या स्पेक्ट्रम तंत्रज्ञानावर ही मशिन चालते. केवळ १ ते ३ मिनिटातच औषध खरे आहे की बनावट याचा शोध ही मशीन लावते. या मशिनने एकदा अहवाल दिल्यानंतर एनएबीएलमध्ये औषध पाठविण्यात येईल. एनएबीएलचा अंतिम अहवाल आल्यानंतर जर बनावट औषध असेल तर त्या कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे आबिटकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button