
रत्नागिरीत 135 समुदाय आराेग्य अधिकाऱ्यांची बदली राेखली
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना थेट उपकेंद्राच्या पातळीवर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शासनाने समुदाय आराेग्य अधिकाऱ्यांची 351 पदे मंजूर केली आहेत. मात्र, आजच्या घडीला यातील केवळ 235 पदांवर आराेग्य अधिकारी कार्यरत असून उर्वरित पदे अद्याप रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मंत्रालयातील आराेग्य विभागाकडून जिल्ह्यातील 135 समुदाय आराेग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परंतु, आधीच रिक्त पदांमुळे त्रस्त असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून आणखी 135 अधिकाऱ्यांना एकाच वेळी साेडल्यास ग्रामीण आराेग्य यंत्रणेची दाणादाण उडेल, ही बाब लक्षात घेऊन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे.
नवीन भरती पूर्ण हाेऊन मंजूर 351 पदांवर नवीन अधिकारी रुजू हाेत नाहीत, ताेपर्यंत या 135 अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर साेडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. समुदाय, आराेग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कर्कराेग, उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) यांसारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांचा सातत्याने पाठपुरावा व औषधाेपचार केला जाताे. जर या अधिकाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले, तर संपूर्ण जिल्हाभरातील रुग्णसेवेवर त्याचा अत्यंत वाईट आणि गंभीर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे रुग्णहिताचा व काैतुकास्पद असल्याचे स्पष्ट हाेत आहे.




