
फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं ते बोलायचं का? प्रवीण दरेकर यांचा मित्रपक्ष शिवसेनेला मोठा इशारा!
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रामदास कदम यांना मोठा इशारा दिला. भाजपला दोष दिला तर खपवून घेणार नाही, असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. त्यामुळे जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरुन सत्ताधारी दोन पक्षांमध्ये वाद चिघळताना दिसत आहे.
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
“शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा उचलला आहे. मला वाटतं अशाप्रकारचा आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण सत्तेत एकत्र असताना, अशाप्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. एकनाथ शिंदेंवर आरोप करण्याचं आम्ही समर्थन करत नाहीत. कथित ऑडिओ क्लीपची चौकशी लावा. सर्व चौकशा होऊ द्या. पण तुम्ही त्याआड भाजपला दोष देणार असाल तर ते योग्य नाही. आम्हीदेखील ते खपवून घेणार नाहीत”, असा इशारा दरेकर यांनी दिला.
“तुम्हाला तुमच्या नेत्याचा जसा आदर, सन्मान आहे तसा आम्हालाही आमच्या नेत्याचा आणि पक्षाचा आदर, सन्मान आहे. आमची नावे आली, आम्ही थोडी लपून केलंय. त्यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आंदोलन करत होते आमचं तेव्हाही समर्थन होतं आणि आजसुद्धा आहे आणि उद्याही राहील”, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली.
‘फडणवीसांना बदनाम करणारे कोण ते समोर येईल’
“ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैक्तिगत टीका व्हायला लागली, तेव्हा आम्ही रिॲक्ट झालो. ते काय लपून-छपून झालो नाही. मग असं आम्ही म्हणायचं का, पडद्याआड राहून जरांगेंना ताकद देणारं आणखी कोण होतं? त्याचा हिशोब होईल. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायला कोण-कोण पुढे होतं ते सुद्धा समोर येईल”, असा इशारा त्यांनी दिला.
‘खपवून घेणार नाही’
“एखाद्या जबाबदार ज्येष्ठ नेत्याने आपल्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी, आपल्या मुलाचं मंत्रिपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोशन मिळवण्यासाठी बोलावं, आमची काही हरकत नाही. पण भाजपला दोष देणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाहीत. तुम्ही जसे कडक, आक्रमक बोलतात. आम्हाला तसं वागता आणि बोलता येतं”, असं दरेकर यांनी ठणकावून सांगितलं.
दरेकर यांचा मोठा इशारा
“रामदास कदम यांनी सांगावं की कुठल्या भाजप नेत्याने एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा उचलला आहे? आपण सांगता की, भाजपला हाताशी घेऊन मराठा समाजाच्या नेत्याला संपविण्याचा षडयंत्र करत आहात. आम्ही बोलायचं का, देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण कोण ताकद देत होतं?”, असा सवाल दरेकर यांनी केला.
“आपण एका घरात राहतो तर आपण सभ्यता आणि सुसंस्कृतपणा राखला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या विरोधात कट कारस्थान झाले, त्याचं स्वागत आहे का? आता आपल्या नेत्यावर टीका झाल्यानंतर कारवाई झाली पाहिजे या भूमिकेशी आम्हीसुद्धा आहोत. पण भाजप जबाबदार आहे, भाजप षडयंत्र करत आहे, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होत होते, ते षडयंत्र होतं का? त्याचीदेखील चौकशीची मागणी आम्ही करु”, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली.




