चोरद नदीला कचराकुंडीचे स्वरूप; निर्माल्य टाकून पिण्याच्या पाण्याशी खेळ!

पाणीटंचाईचे सावट गडद असताना सुकीवलीत नदी प्रदूषणाचा संतापजनक प्रकार

खेड : नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून संपूर्ण परिसराची जीवनवाहिनी असते. मात्र, खेड–आंबवली मार्गावरील सुकीवली येथील चोरद नदीत टाकाऊ निर्माल्य आणि कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्याने या जीवनवाहिनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नदीपात्रात बिनदिक्कतपणे कचरा टाकून पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या चोरद नदीतील पाण्याची पातळी घटली असून, पात्रातील पाणी आटत चालले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे जतन करणे आणि ते स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, नदीत निर्माल्य, पूजेतील साहित्य आणि इतर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. येता-जाता नदीपात्रात कचरा फेकणाऱ्या नागरिकांना ना पर्यावरणाची चिंता, ना पाण्याचे महत्त्व! नदीचे पात्र म्हणजे कचराकुंडी नव्हे, याचे भानही काहींना राहिलेले दिसत नाही.
एकीकडे पाण्यासाठी वणवण, दुसरीकडे पाण्याचे प्रदूषण! हा विरोधाभास संतापजनक आहे. विशेष म्हणजे, पाणीटंचाईच्या काळात याच चोरद नदीपात्रातील पाण्याच्या आधारे तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची तहान भागवली जाते. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीही या नदीतील पाण्याचा उपयोग केला जातो. यंदा पाणीटंचाईचे मोठे सावट निर्माण होण्याची शक्यता असताना नदीचे पाणी दूषित करण्याचे प्रकार सुरू राहणे म्हणजे भविष्यातील पाणी संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
यात भर म्हणजे नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे पाण्याच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
प्रशासन आता तरी जागे होणार का? नदीपात्रात निर्माल्य व कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, जनजागृती करणे आणि नदी परिसराची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नदीचे पाणी हे सार्वजनिक संपत्ती आहे. त्याचे प्रदूषण करणे म्हणजे स्वतःच्याच पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण करणे होय. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारी ओळखून नदीपात्रात कचरा आणि निर्माल्य टाकणे थांबवावे; अन्यथा पाणीटंचाईच्या काळात स्वच्छ पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button