कळवंडे धरणात अवघा ८ ते १० टक्के पाणीसाठा; ग्रामस्थ आक्रमक!

पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी; अन्यथा लघुपाटबंधारे कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक देण्याचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणात अवघा ८ ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी प्रशासनाला धारेवर धरले आहे. पुढील आठ ते दहा महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, तसेच कळवंडे गावाला पाणीपुरवठ्यात प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास हजारोंच्या संख्येने लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक देऊन आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत उदेग यांच्या घरी झालेल्या बैठकीला सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ उपस्थित होते.

कळवंडे धरणाला तीन वर्षांपूर्वी गळती लागली होती. त्यावेळी प्लास्टिकचे कागद वापरून गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यंदा धरणात ३० ते ४० टक्के पाणीसाठा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, श्रावण महिन्यात शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने साठा कमी झाला. पाऊस कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी शेतीसाठी पाणी न उचलण्याचा निर्णय घेतला होता.

तरीही गणेश विसर्जनाच्या काळात धरणातून पाणी सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विसर्जनासाठी खड्डा तयार करून त्यामध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय गावाने घेतला होता. मात्र, धरणाखालील गावातील नदीत पाणी उपलब्ध व्हावे आणि विसर्जन करता यावे, यासाठी पाणी सोडण्यात आल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पाण्याचा वापर करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पाणीपुरवठा समितीत कळवंडेच्या सदस्यांना प्राधान्य द्या

धरण कळवंडे गावाच्या हद्दीत असल्याने पाणीपुरवठा समितीमध्ये कळवंडे गावातील किमान ७५ टक्के सदस्य असावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच धरणाखालील गावांनी पाण्याची मागणी केल्यास कळवंडे ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

लघुपाटबंधारे विभागाकडून धरणात ४० टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात केवळ आठ ते नऊ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे काही ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रत्यक्ष उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

टँकरची तरतूद करण्याची मागणी

आगामी काळात कळवंडे गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने गावाचा समावेश पाणीटंचाई आराखड्यात करावा. गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच तरतूद करावी, अशी मागणी वसंत उदेग यांनी केली.

या बैठकीला लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. खोत उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले. बैठकीला ग्रामपंचायत सदस्य, पाणीपुरवठा समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कळवंडेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन पाणीटंचाईच्या काळात गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासन यावर काय उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button