मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज!

Mitchell Starc Record : ऑस्ट्रेलियाचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. भन्नाट गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४५० विकेट्स घेणारा जगातील पहिलाच डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान त्याने हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी येताच त्याला ४५० विकेट्सचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या २ विकेट्सची गरज होती. २ विकेट्स घेताच त्याने ४५० विकेट्सचा पल्ला गाठला. आतापर्यंत खेळलेल्या १०९ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने २६ च्या सरासरीने ४५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत शेन वॉर्न अव्वल स्थानी आहे. शेन वॉर्नने ७०८ गडी बाद केले होते. तर ग्लेन मॅकग्राने ५६३ विकेट्स घेतले आहेत. आता मिचेल स्टार्कने ४५० विकेट्स घेतल्या आहेत.

स्टार्कने मोडला ग्लेन मॅकग्राचा रेकॉर्ड

या सामन्यात ४५० विकेट्स घेताच त्याने दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा रेकॉर्ड मोडून काढला. स्टार्कने सर्वात कमी चेंडूंमध्ये ४५० विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डमध्ये ग्लेन मॅकग्राला मागे टाकलं आहे. ग्लेन मॅकग्राने २३,४७४ चेंडूंमध्ये ४५० विकेट्स पूर्ण केले होते. तर स्टार्कने २०,५७७ चेंडू टाकून ४५० विकेट्स घेतल्या आहेत.

मिचेल स्टार्कची कामगिरी

कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. आतापर्यंत त्याने एकाच डावात १९ वेळा ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तर ४ वेळा एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यादरम्यान ५८ धावा खर्च करून ७ गडी बाद ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरी त्याने अॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळताना केली होती. गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याच्या नावे २५०० हून अधिक धावा करण्याची नोंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button