
मला ५०० कोटी दिले असं तुम्ही भाजपाला सांगितलंय का?”; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप; दिलं खुलं आव्हान; म्हणाले…
: विजयादशमीच्या निमित्ताने नारायण गडावर आज मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी विविध विषयांवर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी ३ मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. तसेच ‘जो नेता आणि पक्ष मराठा समाजाच्या विरोधात जाईल, त्याला २०२९ ला निवडून द्यायचं नाही’ असा निर्धारही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. मला ५०० कोटी रुपये दिले असं तुम्ही भाजपाला सांगितलं आहे का? माझं नाव सांगून तुम्ही दिल्लीतून ५०० कोटी आणले का? असा सवाल मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच आजच दसरा मेळाव्यातून उत्तर देण्याचं आव्हान जरांगे यांनी शिंदे यांना दिलं आहे. मनोज जरांगे यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
“आता तुम्हाला एक गंभीर गोष्ट सांगणार आहे. मला एक गोष्ट सात ते आठ महिन्यांपूर्वी समजली. मात्र, मी ती गोष्ट मनातून काढून टाकली. पण मी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्यानंतर सात ते आठ दिवसांनी मला एक गोष्ट समजली. मला या गोष्टीचं उत्तर तुमच्यासमोर घ्यायचं आहे. दोन ते अडीच वर्षांपूर्वी एक भयंकर षडयंत्र रचलं गेलं होतं. मात्र, मला सांगणाऱ्यांनी ते तेव्हा न सांगता आता सांगितलं. ते षडयंत्र असं होतं की आता मला याचं उत्तर हंव आहे. याचं उत्तर मला मिळालं नाही, तर मी सोडणार नाही. मी याचं उत्तर एकनाथ शिंदे यांना मागत आहे”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
‘तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले का?’
“मी आता जे बोलत आहे, या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात द्यावं किंवा उद्या द्यावं. शिंदे साहेब तुम्ही भाजपाच्या काही लोकांना माझ्याबद्दल असं सांगितलं आहे का की, जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते ५०० कोटी रुपये तुम्ही घेऊन मला दिले, असं तुम्ही भाजपाच्या नेत्यांना सांगितलंय का? कारण भाजपाचे नेते कुजबुज करत आहेत की जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने ५०० कोटी रुपये पोहोचलेत. जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आहे असं तुम्ही भाजपाला म्हणाले आहात का? तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले का?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
“जर तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले नसतील तर मग भाजपा तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवत आहात? याचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी सोडणार नाही. ही चर्चा कोणाकोणात झाली याचा पुरावा देखील मी मागितला आहे. माझ्याकडे पुरावा आहे आणि मी हा पुरावा तुमच्यासमोर मांडणार आहे. एकनाथ शिंदे भाजपाला खोटं बोलले आणि त्यांच्याकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि मला दिले म्हणून सांगितलं. मग ५०० कोटी कुठे आहेत? मी आतापर्यंत ५ हजार पाहिले नाहीत आणि ५०० कोटी? जर हे खोटं असेल तर एकनाथ शिंदे यांनी ते दिलखुलास सांगावं की ते खोटं आहे. जर खरं असेल तर तसंही सांगावं”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
“शिंदे सांहेब ५०० कोटी तर माझ्या मराठ्यांच्या खिशातले पाकिटे गेले असतील. ३ ते ४ हजार कोटींचे फक्त फुलं टाकले असतील. तसेच मी जर उद्या म्हटलं की प्रत्येक घराघरातील मराठ्यांनी फक्त १०० रुपये टाका तर उद्या सकाळपर्यंत माझ्याकडे अडीच हजार कोटी रुपये होतील”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.




