
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त चिपळूणमध्ये दृष्टिबाधितांचे रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक
नॅबच्या जिल्हा शाखेचा उपक्रम; पांढऱ्या काठीचे महत्त्व आणि दृष्टिबाधितांच्या अडचणींबाबत जनजागृती
चिपळूण : जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) चिपळूणमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील विजापूर-गुहागर रस्त्यावर दृष्टिबाधितांनी पांढऱ्या काठीच्या साहाय्याने रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
दृष्टिबाधितांच्या जीवनात पांढऱ्या काठीचे असलेले महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पांढरी काठी दृष्टिबाधितांना स्वतंत्रपणे चालताना मार्गातील अडथळे ओळखण्यास आणि सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत करते, हा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष निलेश भुरण, सेक्रेटरी भरत नांदगावकर, अमिता टिकेकर, खजिनदार नयन साडविलकर, ॲड. विवेक रेळेकर आणि प्रकाश पाथरे उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब गॅलेक्सीच्या अध्यक्षा विद्या रेळेकर, लायन्स क्लब युनिटीच्या अध्यक्षा प्रणिता कपडेकर आणि दृष्टिबाधित बांधव-भगिनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नॅबचे विकास अधिकारी संदीप नलावडे, सहाय्यक रुपेश गुरव आणि नॅबच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




